0

काटी - (उमाजी गायकवाड) 
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील पोलिस पाटील लक्ष्मण माळी यांची दोन वर्षांची मुलगी कु. राजनंदिनी लक्ष्मण माळी हिचा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळ येथील मारुती मंदिरात एका अनोख्या पद्धतीने दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. मंगरुळ येथील पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांच्या मुलीचा आज दुसरा वाढदिवस होता. मात्र पोलीस पाटील माळी यांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून गावातील नागरिकांना आशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांच्या हस्ते मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 10:30 वाजता 150 सॅनेटायझर बॉटल आणि 500 मास्कचे वाटप करुन एक अनोखा सामाजिक संदेश दिला.
लक्ष्मण माळी यांची कन्या राजनंदिनी हिचा आज वाढदिवस होता. दोन वर्षांपूर्वी राजनंदिनी हिचा जन्म झाल्यानंतर पोलीस पाटील माळी यांनी बसस्टॅन्ड ते घरापर्यंत रांगोळी व फुले अंथरुण अनोख्या पद्धतीने स्त्रीजन्माचे स्वागत केले होते. राजनंदिनी हिच्या वाढदिवसाच्या खर्चातून त्यांनी हे 500 मास्क आणि 150 सॅनेटायझर बॉटल देण्याचे ठरविले. पोलीस पाटील माळी यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असून सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व‌ या रोगाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप केले असल्याचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांनी सांगितले.
         यावेळी पोलीस पाटील लक्ष्मण माळी, इंद्रजित हजारे,राम बचाटे,बिभीषण हजारे, सचिन माळी, हरिश्चंद्र शिनगारे, विक्रम हजारे आदी मान्यवरांसह आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top