0

काटी - (उमाजी गायकवाड) 
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व कन्या शाळेला गुरुवार दि. (24) रोजी ठेकेदारा मार्फत पुरविण्यात आलेल्या तांदूळ कमी आणि मुगडाळ अत्यंत निकृष्ट असल्याचे तसेच मापात पाप होत असल्याचे स्टिंग अॉपरेशन येथील शाळा व्यवस्थापन समितीने केले. सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी पहिली ते आठवी पर्यंतच्या तिन्ही शाळेतील 560 विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा कमी तर शालेय व्यवस्थापन समितीने आलेला शालेय पोषण आहाराचा माल मोजला असता प्रत्येक तांदळाच्या गोणीत 10 किलो, 12 किलो, 13 किलो व 5 किलो तांदूळ कमी आल्याचे स्टिंग अॉपरेशन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील, अतुल पवार, बापुसाहेब पाटील यांच्यासह सदस्यांनी केले. राज्य शासनाच्या शालेय विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्‍या पोषण आहाराच्या मापात पाप असल्याचे स्टिंग अॉपरेशन येथील शालेय व्यवस्थापन समितीने केल्यानंतर तात्काळ शाळेला पुरविण्यात येणारा तांदूळ मोजून देण्यात आला.शालेय व्यवस्थापन समितीच्या सतर्कतेमुळे आहारातील गैरव्यवहार टळला. जिल्ह्यातील बऱ्याच शाळांना तांदूळ आणि धान्य माल ताब्यात घेतला नाही तर आहार शिजवणे अवघड जाते व मुले आहारापासून वंचित राहतात. त्यामुळे शिक्षकदेखील कमी माल असला तरी स्वीकारतात. मात्र याचा गैरफायदा ठेकेदार,पुरवठादार घेत आहेत. याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे मत येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील, अतुल पवार,  बापुसाहेब पाटील यांच्यासह सदस्यांनी व्यक्त केले. वास्तविक शाळांनी अशा कमी मालाचा व निकृष्ट धान्याचा लगेच पंचनामा करून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यायला हवा. त्यामुळेच हे पुरवठादार वठणीवर येणार असल्याचेही मत व्यक्त केले.
       या स्टिंग ऑपरेशन प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील, अतुल पवार, बापुसाहेब पाटील, शालेय पोषण आहार विभाग प्रमुख मोहन भोसले, शाळेचे मुख्याध्यापक पठाण, सहशिक्षक कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अमोल काळदाते, भिमराव फडके, सुहास करंडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top