लोककलावंत छगन चौगुले यांचं निधन - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Thursday, May 21, 2020

लोककलावंत छगन चौगुले यांचं निधन


मुंबई-लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले. सेव्हन हिल्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांच्या ध्वनीमुद्रीका आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पण 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली' या गाण्याने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये छगन चौगुले यांचं हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं.मुळात जागरण गोंधळी असलेल्या छगन यांनी लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र त्यांच्यातील अंगभूत गुणांमुळे ते लोककलावंत म्हणून प्रसिद्ध झाले. 


कला सादर करण्याची त्यांची पद्धत ही इतरांहून वेगळी होती. छगन चौगुले यांनी कुलदेवतांची गाणी आणि लोकगीतं विशेष गायली.लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील लोकगीतं, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारसाठी छगनरावांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. छगनरावांनी सांगितलेल्या देवदेवतांच्या कथा, गायलेली कुलदेवतांची गाणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


दरम्यान, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमरशेख अध्यासन, लोककला अकादमीचे प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांनी छगन चौगुलेंच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं की, ' छगन चौगुले यांचं खूप मोठ योगदान महाराष्ट्रातील लोकसंगीतात आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यागत प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. जागरण, गोंधळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. 


कॅसेट विश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.''सोशल मीडीया, प्रसार माध्यम ज्यावेळी जास्त प्रचारात नव्हती त्यावेळी त्यांच्या अनेक कथागीतांच्या ध्वनीचित्रफिती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ऐकल्या जात होत्या. श्रेयाळ-चांगुणा, सती अनुसया, चिलया बाळ, नवनाथ कथा, भैरवनाथ कथा, खंडोबा म्हाळसा लगीन, नवरी नटली यासारख्या अनेक ध्वनीचित्रफिती लोकप्रिय झाल्या. माझ्या सहकार्याने त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवरील लोककला महोत्सवांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.'

Advertise By Google